
पुसद: वाशीम या मुख्य मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर भल्ला मोठा खड्डा पडल्याने नागरिकांना रहदारीस मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. या खड्डयांमध्ये वाहने जाऊन छोटेमोठे अपघात घडत आहे. या खड्डयांची दुरुस्ती न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे येथील अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून या रस्त्यांची त्वरीत दुरूस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद- वाशीम मुख्य रस्त्यावरील खंडाळा घाटातील रस्त्याच्या कडेला एका पुलावर भल्ला मोठा खड्डा पडला आहे.या मार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जिवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून हा खड्डा जणू काही अपघाताचे निमंत्रण देत आहे. या मार्गावर पुसद शहरातुन मुंबई पुणे येथे जवळपास २५ ते ३० खाजगी ट्रॅव्हल्स,सकाळ संध्याकाळ ये-जा करीत असतात तर दुसरीकडे दिवस- रात्र वाहतूक सुरू असते ३०खाजगी ट्रॅव्हल्सवाले अपरडीपर देत असताना या वाहनांचे लाईट समोरच्या वाहनांवर होते त्यावेळी या वाहनधारकांना अचानक समोरचं दृश्य दिसेनासे होते त्यावेळी या रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात ते चारचाकी दुचाकी वाहन जावुन अपघात होत आहेत.पंरतु या खड्डयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.पुसद ते वाशिम मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरील हा भल्ला मोठा खड्डा रहदारीस अडथळा निर्माण करीत असून अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.या पुलावर मोठे भगदाड व खड्डे पडले. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. एखादा मोठा अपघात होण्याची वाट, तर सार्वजनिक बांधकाम विभाग पहात नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहेत. रस्त्यावरील खड्डा बुजवला जात नसल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरीक आणि वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे.
