
दखल :- चटका देऊन जाणाऱ्या मृत्यूची!
पत्नी बरोबर पतीनेही सोडले आपले प्राण!
हरंगुळ तांड्यातील अतिशय दुखद घटना!
लातूर:- जिल्ह्यातील हरंगुळ (खुर्द) हा तांडा गोर बंजारा समाजाचा तांडा असून फेब्रुवारी २०२५च्या पहिल्या आठवड्यात या तांड्यामध्ये एक अद्भुत घटना घडली ती ऐकली तर कोणालाही विश्वास बसणार नाही!
तुम्ही आम्ही अनेक मृत्यू पाहिले आहेत आणि अनेक अपघात पाहिले आहेत. त्यामध्ये कुटुंबातील अनेक माणसं एकाच वेळी मरतात. परंतु वृद्धापकाळाने पत्नीला आलेल्या मृत्यूचे दुःख सहन न होता लगेच दुसऱ्या दिवशी प्राण त्यागने म्हणजे खरोखरच पत्नी आणि पतीचे अतूट प्रेम म्हणावे लागेल. आपण इतिहासामध्ये लैला- मजनू, हिर-रांजा, जोधा- अकबर अशा अनेक एकमेकांवर अतूट प्रेम करणाऱ्या पती-पत्नीचा इतिहास वाचलेला आहे. परंतु लातूर जिल्ह्यातील फुलचंद राठोड (नाईक) आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई फुलचंद राठोड नाईक यांचे अतुट प्रेमाची जोडी तुम्ही आम्ही पाहिलेली नाही. परंतु या अनमोल जोडीने आपल्या आयुष्याचे जवळपास शंभरी गाठल्यानंतर पार्वतीबाई फुलचंद राठोड यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी अल्पशा आजाराने दिनांक ४ फेब्रुवारी२०२५ रोजी रात्री अकरा वाजता मृत्यू झाला. सगळी पाहुणेमंडळी, नातेवाईक, मित्र आणि इतर गावातील मंडळी मिळून दुसऱ्या दिवशी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी बंजारा स्मशानभूमी हरंगुळ खुर्द तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी दुपारी साडेबारा वाजता अंत्यविधी उरकवण्यात आला. हे सर्व अंत्यसंस्काराचे सोपस्कार सुरू असताना मात्र पार्वतीबाई राठोड यांचे जीवनसाथी व पती फुलचंद राठोड नाईक वयोमान १०७ वर्ष यांनी आपल्या पत्नीच्या मृत्यूने एकदमच त्यांना धक्का बसला आणि त्यांनी आपल्या पत्नीच्या अंत्यविधी कार्यक्रमाला दोन दिवस होत नाही तर त्यांनी आपल्या पत्नी बरोबर ८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री साडेसहा वाजता वाट धरली. यावरून पार्वतीबाई फुलचंद राठोड आणि फुलचंद रेऊ राठोड नाईक यांच्या अतूट प्रेमाची, जोडीची आणि जीवनसाथीची कहानी स्पष्ट होते.
फुलचंद राठोड नाईक यांचे लग्न कमी वयामध्ये पार्वतीबाई फुलचंद राठोड यांच्यासोबत झाले. त्यांनी अतोनात काबाडकष्ट करून आपला संसार फुलवला. त्यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर सहा मुले आणि दोन मुली वाढल्या .सहा मुले आणि दोन मुलीचे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ही त्यांनी खंबीरपणे राहून सर्वांची लग्न पार पाडली आणि सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. राठोड कुटुंब हे सर्व सुख सोयीने सज्ज असल्यामुळेच पार्वती बाई राठोड आणि फुलचंद राठोड नाईक यांनी वयाच्या आपल्या आयुष्याच्या शंभरी गाठलेली आहे. यामध्ये त्यांच्या मुलांचा खूप मोठा वाटा आहे. आयुष्याच्या वाटेवर चालत असताना पार्वतीबाई राठोड आणि फुलचंद राठोड नाईक यांना अनेक संघर्षाचा सामना करावा लागला. परंतु ते कधीही घाबरले नाही. “सत्य परेशान होता है, पराजित नंही” ह्या ब्रीद वाक्याची खूणगाठ मनासी बांधून ते सदैव आपल्या कुटुंबासाठी संघर्षथ राहिले आणि फुलचंद राठोड यांच्या खांद्याला खांदा लावून एखाद्या वाघीणसारखी पार्वतीबाई राठोड या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळे फुलचंद राठोड नाईक यांचा संसाराचा गाडा हाकताना फार मोठी मदत झाल्याचे नाकारता येत नाही. कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो याचे ज्वलंत उदाहरण जर पाहायचे असेल तर ते फुलचंद राठोड आणि पार्वती बाई राठोड यांच्याकडे पहावे लागेल.
फुलचंद राठोड आणि पार्वती बाई राठोड यांची जीवन संघर्षाची कहाणी फार मोठी आहे. त्यांच्या हायातीमध्येच त्यांचे आठ मुलामुली पैकी एक मुलगा आणि दोन मुली मृत्यू पावलेल्या आहेत. परंतु त्या मृत्यूचे भांडवल न करता त्यांनी उर्वरित जिवंत मुलाला हिम्मत देऊन “मुयेन मठ्ठी, आणि जिवतेन बाटी” या गोरसिकवाडीच्या नाऱ्यानुसार जगण्याचे बळ दिले. फुलचंद राठोड नाईक हे करारी, प्रामाणिक, स्पष्ट बोलणारे “फाटण आवो चाय तुटन आवो” असे हिम्मतवान व्यक्तिमत्व होते. त्यांनी कधीही बोटचेपेपणा केला नाही. संपूर्ण आयुष्य ते सत्याच्या मार्गाने चालत राहिले. त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला. अनेकांच्या दुःखामध्ये ते धावून गेले. आपल्याजवळ पैसा असो नसो त्यांनी इतरांकडून पैसे घेऊन लोकांना मदत केली. लोकांचे दुःख म्हणजे आपले दुःख हे समजून त्यांनी आपली जीवनाची वाटचाल केली म्हणूनच ईश्वरांनी त्यांना भरभरून आयुष्य दिले असे म्हटले तर वावगे होणार नाही.
फुलचंद राठोड नाईक यांची मदत करण्याची हातोटी हेरून पार्वतीबाई फुलचंद राठोड यांनी आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ग्लासभर पाणी आणि एक चटणी- भाकर देण्यासाठी त्या कधीही कचरल्या नाहीत. रात्री बे रात्री कोणीही येवो त्याची जेवणाची व्यवस्था करण्यामध्ये त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. म्हणून पार्वतीबाई नाईक यांची तांड्यामध्ये फार मोठी कीर्ती होती. हरगुळ तांड्यामध्ये अनेक स्त्रियांच्या अडचणी जसे डिलेवरी, तीज- तेव्हार, होळी, दिवाळी इतर अनेक सणांमध्ये पार्वती बाई फुलचंद राठोड यांनी हिरारीने भाग घेतला आणि तेवढ्याच ताकतीने फुलचंद राठोड नाईक यांनी पार्वती बाईला मोकळीक दिली होती. हरगुळ तांड्यामधील कोणताही कार्यक्रम पार्वतीबाई राठोड आणि फुलचंद राठोड नाईक यांच्याशिवाय पार पडणे शक्यच नव्हते इतके हे जोडपे लोकप्रिय होते. दोघांनीही कधीही एकमेकाची साथ सोडली नाही. कोणत्याही गावाला जायचे असेल ते हाट- बाजार असो की, एखाद्याचे लग्न किंवा तेरवी ते दोघेही सोबतच असायचे, आणि सोबतच राहायचे एवढेच नव्हे तर शेतामध्ये काम करताना सुद्धा फुलचंद राठोड यांनी पार्वतीबाई राठोड यांना सोबत घेतल्याशिवाय कधीही ते शेतात गेली नाही. इतके अतूट प्रेम एकामेकावर करणारे हे जोडपे जगाच्या प्रेम कहाणी मधील हिरो हिरोईन पेक्षाही अमर असल्याचे दिसून येते. आपली बायको मेल्याचे दुःख सहन न झाल्यामुळे ते एकाएकीच शांत झाले. त्यांना काही सुचत नव्हते आपली बायको गेली आता मी मागे राहून काय करणार या एकमेव उद्देशाने त्यांनी आपल्या पत्नी बरोबर जाण्याचा मनातल्या मनात निर्णय घेतला आणि पत्नीच्या अंत्यसंस्कारला दोन दिवस होत नाही तर त्यांनी आपले प्राण त्यागले, आपल्या पत्नीवरील अतूट प्रेमाची सर्वांनाच आठवण करून दिली. दोघांचेही मृत्यू आज हरंगुळ तांडयासाठीच नाही तर संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये चटका लावून जाणाऱ्या मृत्यूची कहाणी आहे.
आज फुलचंद राठोड आणि पार्वतीबाई राठोड यांच्या कुटुंबामध्ये जवळपास १६० ते१७० माणसे असून हरंगुळ परिसरात आणि लातूर तालुक्यात राठोड परिवार हा मानवाईक परिवार म्हणून आजही मान्यता प्राप्त आहे. आज या कुटुंबामध्ये एक मुलगा जिल्हा परिषद शिक्षक असून एक मुलगा कॉन्टॅक्टर आहे. व फुलचंद राठोड नाईक यांचा एक नातू पत्रकार असून एक नातू इंजिनियर व एक नातू बिजनेस मॅन आणि एक नातू डॉक्टर आहे. फुलचंद राठोड आणि पार्वतीबाई राठोड यांच्या चटका लावून जाणाऱ्या मृत्यूने आज लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चेचा विषय झालेला असून सर्वच मंडळी या अद्भुत मृत्यूमुळे हळहळ करत आहे. अशिक्षित असूनही एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी ही जोडपी इतिहासातील अनेक प्रेमवीर जोडीला मागे टाकणारी आहे. असे म्हटले तर वावगे होणार नाही. दोघांच्याही मृत्यूने सर्वांनाच चटका लावून दिलेला असून ही अतूट प्रेमाची अनमोल जोडी निश्चितच बोध घेण्यासारखी आहे. या जोडीने हरंगुळ तांड्यामध्ये संस्काराचे मोती सोडून गेल्यामुळे निश्चितच हरंगुळ तांडा फुलल्याशिवाय राहणार नाही. कारण पार्वतीबाई नाईक यांच्या जोडीदाराचे नावच फुलचंद राठोड आहे. कितीही लिहिले तरी ते कमीच पडणार आहे. शेवटी फुलचंद राठोड नाईक व पार्वतीबाई राठोड यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो!
धन्यवाद!!
✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद- 94 21 77 43 72