” निरपेक्ष मानसन्मान हा डॉक्टरांना समर्पित समाजसेवेसाठी अक्षय ऊर्जास्रोत असतो ” असे भावोद्गार डॉक्टर प्रसन्नकुमार रेदासनी यांनी काढले.राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त दिनांक १ जुलै २०२५ रोजी भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी , स्री रोग तज्ज्ञ डॉ.नंदा जैन, स्री रोग तज्ज्ञ तथा सर्जन डॉ. प्रथमेश जैन यांचा हृद्य सत्कार शाल, श्रीफळ, पुस्तक देऊन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना डॉ. रेदासनी बोलत होते. डॉक्टरांनी या वर्षाच्या डॉक्टर दिनाची थीम ” Behind the Mask : Who Heals the Healers ” सांगून सांगोपांग चर्चा केली. तारा लॅबोरटरीच्या सुसज्ज यंत्रणांची व सामाजिक उपक्रमांची माहितीही डॉ. रेदासनी यांनी दिली. प्रारंभी भारतरत्न डॉ.बी.सी.रॉय यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी रुख्मिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज जैन व पॅथालॉजी तंत्रज्ञ गणेश शिंपी उपस्थित होते. नेत्रतज्ज्ञ डॉ.अंजली चौधरी यांचा सत्कार केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीळकंठ गायकवाड यांच्या हस्ते व सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.विवेक चौधरी यांचा सत्कार निवृत्त प्राथमिक उपशिक्षणाधिकारी वाय.एन. ठोसरे यांनी केला.
मार्गदर्शनात गायकवाड आप्पा म्हणाले की , ‘ डॉक्टर रुग्णसेवा ईश्वर पूजा मानतात.नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणून डॉक्टर हे पृथ्वीवरील ईश्वर आहेत या श्रद्धेतून व सामाजिक उत्तरदायित्वातून श्रद्धापूर्वक डॉक्टरांच्या रुग्णांप्रती समर्पण भावना व अथक प्रयत्नांच्या अमूल्य योगदानाचा कृतज्ञतेने सत्कार करणे समाजाचे कर्तव्य आहे.या विशुद्ध भावनेपोटी ५ वर्षापासून पुस्तक भिशी डॉक्टरांचा सत्कार करीत असते.’ ठोसरे साहेब यांनी मनोगतात कोरोना काळात डॉक्टरांनी दाखविलेले धाडस व त्यागाचे दाखले देत रुग्णांना जीवदान देणाऱ्या अतुलनीय व्यवसायनिष्ठेबद्दल चौधरी दाम्पत्यांचे विशेष कौतुक केले.
डॉ.आर.एस. डाकलिया ( संस्थापक , मानवसेवा मंडळ ), नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.पवन चांडक व डॉ.सविता चांडक यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला. नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रुती चांडक यांचा सत्कार मुक्त पत्रकार डॉ.मंजुषा पवनीकर व डॉ.पियुष चांडक यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते पंकज पवनीकर यांनी केला.डॉ.चांडक दाम्पत्यांचे लुल्हे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले आणि आशिर्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.








