Home » जीवनशैली » सामाजिक » ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना पुसद यांची सभा संपन्न…

ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना पुसद यांची सभा संपन्न…

Share:

पुसद | 15 जुलै 2025

ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना पुसद यांची भव्य सभा आज पंचायत समिती पुसद येथे पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी अरुण भिमराव बरडे होते. त्यांच्यासह उपाध्यक्ष सचिन ठाकरे, ईश्वर जाधव आणि तालुक्यातील अनेक संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगणक परिचालक मागील १४ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध योजना ऑनलाइन राबवण्याचे काम करत आहेत. डिजिटल भारताचे स्वप्न खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. जन्म दाखले, मृत्यू दाखले, घरकुलाचे अर्ज, शौचालय योजना, नळजोडणी, मजुरांच्या हजेरी, ग्रामसभेचे अहवाल, आणि शासनाच्या कितीतरी योजनांची कामं तो पार पाडत असतो. तो फक्त टायपिंग करणारा नसून, गावाचं डिजिटलीकरण करणारा अनमोल धागा आहे.

मात्र इतके महत्त्वाचे काम करूनही शासनाकडून याकडे दुर्लक्षच होत आहे. रोजगार हमी योजनेतील मजुरांपेक्षा कमी मजुरीवर हे कर्मचारी काम करत असून, त्यांना अनेकदा ४-४ ते ५-५  महिने मानधनही मिळत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर सरकारी विभागांची कामेही त्यांना बिनपगारी करावी लागतात. या अन्यायकारक परिस्थितीमुळे त्यांच्याकडून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.

मागील काही वर्षांपासून संघटना विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने आणि उपोषण करत आहे. मात्र तरीही प्रशासनाकडून याबाबत ठोस निर्णय घेतले गेलेले नाहीत. त्यामुळे या लढ्याला आता आणखी धार देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

सभेत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली –
सभासदांमध्ये नवचेतना जागवणे, विचारविनिमयासाठी नवीन गट तयार करणे, केवळ सक्रीय सभासदांनाच पुढे आणणे, प्रत्येक सभेला उपस्थित राहणे सक्तीचे करणे, दोन वेळा अनुपस्थित राहिल्यास सभासदत्व रद्द करणे, आणि आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रोजेक्टबाहेरील कोणतीही कामे न करणे.

यावेळी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यासाठी सर्व सभासदांनी एकसंघ राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *