भारता देश नर नररत्नाची खाणच आहे. भारताच्या अनेक या महान विचारवंतांनी देशाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले आहे. अशाच एका विचारवंता मध्ये थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे होऊन गेले. बऱ्याच साहित्यिकांनी चंद्र ,सूर्य, तारे, नदी,नाले, स्त्री शृंगार यावर आपली लेखणी चालवली. ज्या लेखणीचा समाजाच्या उत्थानासाठी काहीही उपयोग झालेला नाही. अण्णाभाऊंची लेखणी मानवतेच्या मूल्यासाठी झिजली. तिचा सुगंध परदेशात अजूनही दळवळत आहे. साहित्यात काय लिहावे याबाबत दीड दिवस शाळेत गेलेल्या प्रतिभा संपन्न साहित्यिकाने जगाला दाखवून दिले. अनेक साहित्यिक आहेत परंतु बोटावर मोजण्या इतक्या साहित्यिकांची नावे लोकांच्या तोंडावर कायम आहेत त्यापैकीच अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या सर्व जाती असलेल्या गावात झाला. अण्णाभाऊ साठे यांची जन्मतारीख त्यांच्या आईने सांगितलेल्या घटनेवरून निश्चित करण्यात आलेली आहे. ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यासाठी जहाल विचाराचे काम करणारे लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला तो दिवस म्हणजे १ ऑगस्ट १९२० साली झाला. त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना बेजार करून जरीस आणणाऱ्या काही जातींना गुन्हेगार ठरविले होते त्यापैकी मातंग समाज हा सुद्धा होता. फासे पारधी, मातंग या जातींना गुन्हेगार जमात ठरविण्यात आलेली होती. अण्णाभाऊ साठे या जमातीतून आलेले असल्याने या जमातींना इंग्रज कोणतेही काम देत नसत. या जमातीवर कडक बंदोबस्त ठेवला जाई. अण्णाभाऊ साठे आई वालू बाई हिच्या सांगण्यावरून शाळेमध्ये दाखल झाले. शाळेमध्ये त्या काळात विषमता होती. मागास मुले वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेत होती. अण्णाभाऊ पहिल्या दिवशी शाळेमध्ये वर्गाबाहेर बसून शिक्षण घेत होते. दुसऱ्या दिवशी गुरुजी वर्गात नव्हते. वर्गामध्ये उच्च जातीची मुले मागास जातीच्या मुलांची जातीभेद करत. शिक्षक वर्गात मागास मुलांना शिक्षा सुद्धा लांबूनच करीत असत. एका दिवशी कारण नसताना गुरुजींनी अण्णाभाऊ साठे यांना मारहाण केली. त्यानंतर अण्णा भाऊंनी विषमतावादी शाळा कायमची सोडून दिली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी गावातील परिसर नदी, नाले, तमासे तसेच निसर्गातील अनेक गोष्टींचा आस्वाद घेत जीवनाचे अनुभव मिळविले. त्यानंतर दुष्काळ पडल्याने वडील भाऊराव साठे कामाच्या शोधात मुलांना घेऊन मुंबईच्या वाटेला लागले. परिस्थिती अगदी दयनीय असल्याने पोट भरण्यासाठी कोणतेही काम मिळेल ते करून मुंबईला चाळमध्ये राहुन बूट पॉलिश करण्यापासून ते गिरणी कामगारापर्यंत सर्व प्रकारची कामे अण्णा भाऊंनी मुंबईला आल्यावर केली. आपल्या भावंडांचा उदरनिर्वाह व कुटुंबाचा आधार अण्णाभाऊ साठे बनले. मुंबईला आल्यावर त्यांची ओळख कम्युनिस्ट विचारांच्या लोकांशी झाली. त्यातच त्यांनी श्रीपाद डांगे यांचे भाषण ऐकले. कम्युनिस्ट विचारांमध्ये एकमेकांबद्दल आत्मीयता दिसून आली. मुंबईमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करीत असताना कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची उर्मी कम्युनिस्टांकडून मिळाली. रशियामध्ये लेनिन च्या विचारावर विचार मंथन चालू होते. त्या देशाने मार्क्सच्या विचाराची दिशा धरलेली होती. अण्णा भाऊ साठेंवर मार्क्सचा चांगला प्रभाव झाला. कम्युनिस्टांनी चालवलेल्या लढ्यामध्ये जोश करण्याचे काम अण्णाभाऊ व त्यांच्या टीमने केले. अण्णाभाऊंनी घरी आल्यावर आप्तेष्टांच्या तमाशामध्ये काम केले. अण्णाभाऊ साठे यांनी तमाशाला लोकनाट्य बनविले. देवाच्या नावाने सुरू होणारे तमाशे कामगारांच्या, कष्टकरांच्या, महापुरुषांच्या विचाराने गण तयार केले. मानवतेवर लोकनाट्य उभे केले. तमाशा मधील शृंगार आला विचारक्रांतीची जोड दिली. आजचा तमाशा अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला पारखा झालेला आहे. त्यातील स्त्रियांवरील अश्लील विनोद साहित्याला बदनाम करीत आहे. शृंगारिक काव्याला विचाराच्या दुसरा पदर दिसत नाही. समाजाला प्रबोधन करण्यासाठी लोकनाट्याची चळवळ महापुरुषांच्या विचारावर अण्णाभाऊ साठे यांनी उभी केली. अनेक गीते, पोवाडे, लावण्या, छक्कड , कादंबऱ्या, कथा, प्रवासवर्णने अनेक प्रकारची साहित्य संपदा अण्णाभाऊ साठे यांनी समाजप्रबोधनासाठी लिहिली. जवळजवळ ८५ पुस्तके अण्णाभाऊ साठे यांच्या नावावर आहेत. अनेक नवोदित साहित्यिकांना अण्णाभाऊ साठे यांनी आपण लिहिलेली पुस्तके विना मोबदला देऊन टाकली. अनेक नवोदित कवींना अण्णाभाऊंनी गीत लिहून दिली. समाजाच्या, जीवनाच्या अनुभवातून अण्णाभाऊ साठे यांनी अप्रतिम साहित्य निर्मिती केली. आपल्या साहित्याचे महती पोहोचवण्याचे कार्य अण्णाभाऊ साठे यांनी केले. अण्णाभाऊ साठे वैश्विक साहित्यिक होते. जगाच्या २८ भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद करण्यात आला. रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य नायक ,नायिका सामाजिक प्रबोधन करणाऱ्या निर्माण केल्या. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू मानव होता. कामगार, गरीब, वंचित, कष्टकरी लोकांचे प्रतिनिधित्व करणारा होता. अण्णाभाऊ साठे कादंबरीचा नायक समाजाचा आदर्श होता. तो जरी बंडखोर असला स्वाभिमानी होता. अण्णाभाऊंची कादंबरी ही ज्वलंत, वास्तववादी होती. कादंबरीचा नायक , नायिका प्रत्यक्ष घडलेल्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांनी काल्पनिक साहित्य लिहिले नाही. कार्ल मार्क्स विचारातून त्यांनी वर्ग संघर्ष समजून आला. केवळ कम्युनिस्ट विचार जगाला तारू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण केले. कम्युनिस्ट विचार व बाबासाहेबांचा विचार या दोन्ही चाकावर त्यांनी आपल्या विचाराची धुरा ठेवली. डॉक्टर बाबासाहेबांनी संघर्षासोबत स्वाभिमानालाही महत्व दिले. संघर्ष करीत असताना नैतिक मूल्य घसरता कामा नये यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा विचार कायम मस्तकी ठेवला. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेला विचार "जग बदल करुनी घाव, सांगून गेले मज भीमराव"ह्या विचाराने त्यांनी जीवनभर प्रबोधनाचे काम केले. एका चाळीत राहणारा साहित्यिक मरेपर्यंत चाळीत राहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊंचे अनमोल योगदान आहे. संयुक्त महाराष्ट्र राहावा यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कलापथकाच्या साह्याने महाराष्ट्रभर जनजागृती केली. माझी मैना गावाकडे राहिली या गीताने संपूर्ण महाराष्ट्राला कर्नाटक मधील निपाणी नावाचे गाव तसेच बेळगाव सारखे गावे मुंबई ताब्यात आल्यावर महाराष्ट्रातून सुटली याची खंत त्यांनी लिहिलेल्या छक्कडमध्ये दिसून येते. महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा साहित्यिक झाल्यावर सुद्धा येथील साहित्य मंडळीच्या यादीत येथील सनातन्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे नाव घेतले नाही. अण्णाभाऊ साठे यांनी प्रबोधनाच्या डफावर साहित्य उभे केले. त्यांनी कोणते पुरस्कार मिळावे म्हणून साहित्य लिहिले नाही. त्यांना कोणत्याही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षासाठी साहित्य लिहिले नाही. साहित्यिक कसा असावा? याचे ज्वलंत उदाहरण अण्णाभाऊ साठे आहे. आज अनेक साहित्यिक आपल्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी व्यावसायिक बनले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कोणाकडूनही पैसे न घेता कलापथके चालविली. लाल बावटा या संघटनेद्वारे त्यांनी कामगारांना एकत्रित केले. महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी म्हणून संघर्ष केला. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य अर्थपूर्ण आहे. माणसात अस्मिता निर्माण करणार साहित्य आहे. साहित्यिक बनण्यासाठी त्याला घरामध्ये साहित्यिक परंपरा दिसून येते. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्वजांपासून कोणीही साहित्यिक नव्हते तरीदेखील ते उत्तम साहित्यिक बनले. लोकनाट्यला मूल्यांच्या उच्च पातळीवर घेऊन जाणारा लोकनाट्यकार अण्णाभाऊ साठे होते. त्यांच्या लावण्यामध्ये स्त्रियांना अश्लील दाखविले नाही. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी या मिळालेल्या स्वातंत्र्यावर ताशेरे ओडत त्यांनी घोषणा केली "ये आजादी झुठी है देश की जनता भूखी है"!! स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे प्रश्न सुटायला पाहिजे होते परंतु ते सुटत असताना दिसत नाही त्यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने या स्वातंत्र्यावर आक्षेप घेतला. आज साहित्यिकांच्या लेखण्या बोथट झाल्या आहेत. त्यांना भारतातील ज्वलंत प्रश्न दिसत नाही. भारतातील धर्मांधता वाढत असताना साहित्यिक गुपचूप बसलेले आहेत. अण्णाभाऊ साठे यांचा प्रवास नानासिंह पाटील यांच्या ऐकलेल्या लहानपणीच्या भाषणापासून होतो तर शेवटच्या प्रवास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला समर्पित करून होतो. नानासिंह पाटील हे सत्यशोधक विचाराचे होते. अण्णाभाऊ साठे सारखा साहित्य जगाला मिळणे कठीण आहे. जागोजागी विचार पेरणारा कृतिशील साहित्यिक अण्णाभाऊ साठे होते. दलित, वंचित, कष्टकरी जनतेचा आवाज जगापर्यंत पोहोचविणारा खरा साहित्यिक अण्णाभाऊ साठे होते.
पत्रकार
एस.एच.भवरे








