Home » जीवनशैली » सामाजिक » आपल्या साहित्य कृतीतून प्रबोधन करणारे संत सेना न्हावी !!!

आपल्या साहित्य कृतीतून प्रबोधन करणारे संत सेना न्हावी !!!

Share:


महाराष्ट्रात मराठी साहित्याची सुरुवात महानुभाव संप्रदायातील” लीळाचरित्र” या साहित्यकृतीतून झालेली आहे. जवळ जवळ बाराव्या शतकापासून साहित्य लिहिले गेले. महाराष्ट्रातील संतांच्या अथक प्रयत्नाची फलश्रुती म्हणजे महाराष्ट्राला अध्यात्मातून प्रबोधनाची दिलेले देण होय. संत नामदेवांनी सर्व जातीच्या संतांना एकत्र करून भागवत संप्रदायाची सुरुवात केली. हाच तो वारकरी संप्रदाय नावाने प्रचलित आहे. संत नामदेव यांच्या काळात ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, नरहरी सोनार,बंका, सोयराबाई यासारखे अनेक संत मंडळी सनातनांच्या अवडंबराविरुद्ध आवाज उठविणारी संत मंडळी एकत्रित झाली होती. अशा या काळातील सजग संत म्हणजे सेना न्हावी होय.
‌ संत सेना न्हावी यांचे पूर्वज महाराष्ट्रातीलच होते. विठ्ठल भक्तीची पूर्वापार परंपरा त्यांच्या घरामध्ये चालत आलेली होती. संत सेना न्हावी यांच्या वडिलांचे नाव देविदास पंत तर आईचे नाव प्रेमकुवर बाई होते. आई वडील अत्यंत धार्मिक होते. पूर्वी काही वर्षांनी पूर्वज उत्तर प्रदेशात गेले होते. उत्तर प्रदेशातून मध्यप्रदेश मध्ये जबलपूर जिल्ह्यात बांधवगड या ठिकाणी आले. येथील राजाच्या दरबारी हजामतीचे काम देविदास पंत यांना मिळाले. बांधवगड ठिकाणी संत सेना महाराजांचा जन्म १३५७ ला झाला.राजाची चाकरी करून आपले अध्यात्माचे काम देविदास पंत करीत असत. घरामधील धार्मिक वातावरण यामुळे संत सेना न्हावी यांच्यावर चांगले संस्कार घडले.आई परोपकारी स्वभावाची होती. देवदास पंत व प्रेम कुवर बाई आपल्याला मिळालेले धन धान्य लोकांना दान म्हणून देत असत. संत सेना न्हावी यांच्यावर अनेक भाषांचे संस्कार झालेले होते. मराठी भाषा घरामध्ये परिचित होती. संत सेना न्हावी यांना मराठी भाषेचे ज्ञान असल्याने त्यांची रचना मराठी भाषेमध्ये सुद्धा आढळते. महाराष्ट्रामध्ये या परिवाराची ये जा होती. बहुजनाच्या देव विठ्ठल यांच्या सेवेसाठी महाराष्ट्रामध्ये हे कुटुंब येत असत. संत सेना न्हावी यांनी आपल्या वडिलांनंतर राजाची चाकरी केली नाही. काही दिवसातच त्यांनी आपली पूर्वापार चालत आलेली आज आमची सेवा बंद केली. महाराष्ट्रामध्ये येऊन संत सेना न्हावी यांनी संत नामदेवांनी चालवलेल्या प्रबोधनाच्या कार्यात वाहून घेतले. महाराष्ट्रामध्ये कर्मकांडाच्या नावाने चालत असलेल्या रुढी, परंपरा, चालीरीती याविरुद्ध आवाज उठविला. संत ज्ञानेश्वर व त्यांचे भावंड यांच्याशी असलेले गुरुबंधूचे नाते संत सेना न्हावी यांनी जपले. संत ज्ञानेश्वर यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध संतां मध्ये विद्रोह होता. बहुजनांचे एकच दैवत असावे जिथे कुणालाही सहज जाता यावे यासाठी सकलांचा देव विठ्ठल याची भक्ती करण्याची संतांनी परंपरा सुरू केली. वारकरी म्हणजे जो अन्यायावर वाद करतो तो होय. कर्मकांड सोडून परोपकाळाची भक्ती करणारा वारकरी होय. वेळप्रसंगी अन्याया ठिकाणी विद्रोह करणारा वारकरी होय. सनातल्यांनी चालवलेली समाजाची लूट थांबवण्याचे काम संतांनी केले. संत सेना न्हावी यांनी जवळ जवळ २५७ अभंग रचना केलेली आहे. साहित्यामध्ये अभंग, गवळण, भारुड याप्रमाणे रचना केलेली आहे. शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिबा मध्ये एक अभंग समाविष्ट केलेला आहे. संत सेना न्हावी यांनी हिंदीमध्ये सुद्धा रचना केलेल्या आहे. त्यांच्या काव्यामध्ये फारसी शब्दाचा भरणा आढळतो. अनेक राज्यांमध्ये त्यांनी भ्रमंती केलेली आहे. संत सेना न्हावी यांनी खऱ्या भक्तीचा ऊहापोह आपल्या साहित्यात केलेला आहे. त्यांच्या एक अभंगांमध्ये “धर्माचे थोतांड करुनी भरी पोट l भार्या मुले मठ मजा करी l “या अभंगातून त्या काळातील भोंदू महाराजांबद्दल त्यांनी लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात धर्माच्या नावाचे अवडंबर करून महाराज पोट भरीत आहेत. त्या मठात त्यांच्या परिवाराची मजा चालू आहे. पोरे मठातील संपत्तीवर मजा करीत आहे. त्यांचा तो अभंग आजच्या भोंदू महाराजांना तंतोतंत लागू पडतो. आज आसाराम, राम रहीम, राधे मा, बागेश्वर, अनिरुद्धाचार्य, प्रदीप मिश्रा यासारखे महाराज कोट्यावधी पैसा घेऊन कथा वाचन करून लोकांना लुबाडतात. कित्येक लोक ह्या भोंदूगिरी ला बळी पडतात. अनेकांची फसवणूक होते. आळंदीच्या ठिकाणी मुलींसाठी कीर्तन संस्था आहेत. त्या ठिकाणी सुद्धा मुली सुरक्षित दिसत नाही. धर्माच्या नावावर चाललेले थोतांड आहे. यामध्ये शुद्ध परमार्थ दिसून येत नाही. कीर्तनकार शुद्ध अध्यात्म सांगत नाही. एकमेकांचे टवाळकी करून मनोरंजन केले जाते. दुसऱ्याला टोमणे मारून किर्तन केले जाते. संतांच्या अभंगाला काहीच किंमत देत नाहीत. स्वतः मात्र खूप पैसे घेऊन कीर्तन सादर करतात. संत सेना न्हावी म्हणतात”करिता परोपकार त्याच्या पुण्या नाही पार l करिता परपीडा त्याच्या पायी नाही जोड l “या अभंगातून त्यांनी परोपकार करता या लोकांचे पुण्य वाढते. तर परपीडा देणारा कधी ना कधी अनवाणी होतो. संत सेना न्हावी यांनी एक सुंदर अभंग रचलेला आहे. त्याची रचना आपण आकाशवाणीवर बरेचदा ऐकलेली आहे. ती म्हणजे “जाता पंढरीसी सुख वाटे जिवा l” यामध्ये त्यांना सुख कशात वाटते याचे वर्णन केलेले आहे. संतांनी वेदाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना खडसावले आहे. ते म्हणतात “जेथे वेदा न कळे पार l पुराणाशी अगोचर l” प्रत्यक्ष कृतीवर संतांनी जो दिलेला आहे. वेदाची भाषा करणाऱ्या लोकांना त्यांनी वरवर ज्ञान असलेले मानलेले आहे. ते पुढे म्हणतात” मोक्ष आणि मुक्ती हे तुम्हासी आवडती” सांगण्याचे त्यांचे तात्पर्य असे आहे की, सनातन्यांना मोक्ष आवडतो. मोक्षही काल्पनिक कल्पना आहे. संतांनी खोट्या कल्पनेविषयी नावड दाखविली आहे. संतांनी मोक्ष हा परोकारात मांडला आहे. मोक्षही मनू वाद्यांची भीती दाखवण्यासाठी केलेली लबाडी आहे. त्यांच्या प्रसिद्ध अभंगामध्ये ते म्हणतात”आम्ही वारिका वारिक l करु हजामत बारीक l”म्हणजेच वारिक या शब्दाचा अर्थ आहे वारकरी .. संत सेना हे पंढरीचे वारकरी होते. चुकीच्या गोष्टीला जो विरोध करतो आणि सत्याने जगतो तो म्हणजे वारकरी होय. जे लोक केवळ पढीत पंडिता सारखे बोलतात त्यांना ते म्हणतात”बोलू जाता संगे ब्रह्मज्ञान गोष्टीl अंतरी कपटी बक जैसा l” यामध्ये सेना महाराजांनी ब्रह्मज्ञान सांगण्याचा बहाणा करणाऱ्या लोकांना त्यांनी बगळयासारखे ढोंग करणाऱ्या म्हटलेले आहे. बगळा आपले सावज मिळण्यासाठी स्थितप्रज्ञ अवस्थेत जाऊन बसतो. मनामध्ये त्याच्या मासे पकडण्याचे ‌ कपट असते. अंतरंगाने तो कपटी असतो त्याप्रमाणे ब्रह्मज्ञान माहिती असल्याचा केवळ बहाणा करणारे लोक असतात. संत सेना महाराजांनी दांभिक पणावर ताशेरे ओढलेले आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या देवाचे नामस्मरण होत होते. त्याविरुद्ध वारकरी संप्रदायाने विठ्ठल या बहुजनाच्या दैवतेची रुजवण केलेली आहे. संत सेना महाराजांनी आळंदी महात्म्य, त्र्यंबकेश्वर महात्म्य याचे आपल्या साहित्यात वर्णन केलेले आहे. संत सेना यांचे नाव सेना हे अपभ्रंश होऊन शहाणा या शब्दाची सेना हे झालेले आहे. न्हावी समाज हा सुज्ञ समाज मानला जातो. गावातील गुप्त माहिती ठेवण्याचे काम शिवाजी महाराजांच्या काळापासून करीत होते. त्यापूर्वीही हा समाज गावातील सर्व माहितीचा खजिना ठेवणारा समाज होता. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात न्हावी समाजाचे मावळे होते. नाभिक या शब्दाचा अर्थ होतो की ना भिक मागणारा समाज. हा समाज मेहनतीला महत्व देतो. कुणाकडून फुकट घेत नाही. त्याने आपल्या पाण्याच्या कटोऱ्यावर मेहनत घेऊन उदरनिर्वाह केला. हा समाज भक्तिपरंपरेत आघाडीवर होता. सेना महाराज यांनी आपल्या पुरोगामी विचारातून महाराष्ट्राला प्रबोधन केलेले आहे. आज त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *