Home » जीवनशैली » सामाजिक » मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!

मातीच्या कुशीत राबणारा शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण बैल पोळा !!!

Share:

भारतीय संस्कृती ही फार जुनी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात. आर्य भागामध्ये आल्यावर येथे वैदिक संस्कृती निर्माण झाली. कृषी संस्कृती ही सिंधू संस्कृतीची देणगी आहे. भारतात सर्व सण शेतीवर आधारित आहे. सिंधू संस्कृतीतील मातृदेवता निऋती यांनी शेतीच्या हिताचे निर्णय आपल्या काळात घेतल्याची नोंद आहे. त्या काळात महिलेने शेतीचा शोध लावला होता. माणसाकडे ‌ शिकार करून आणण्याची जबाबदारी होती. त्यानुसार माणसे कुटुंबासाठी बाहेरील कामे करित असत. कालांतराने शेती ला माणसासोबत मदत करणारे पशु यांची साथ लाभली. त्या पशु मध्ये गरीब पशु गाय व बैल यांचा शेतीला उपयोग झाला. मातृसत्ताक पद्धतीत धरणीला माता संबोधले जाई. माणसाला शेती मदत करणारा प्राणी म्हणजे बैल होय. मानवाला शेती करण्यासाठी बैलाची अप्रतिम साथ मिळाली. गाईपासून दूध मिळाले. पशुसंवर्धन करण्याची परंपरा निर्माण झाली.कृषी संस्कृतीत गाय बैल पूजनीय होते. गाई बैलांची कत्तल सिंधू संस्कृती झाली नाही. आर्य आपल्या यज्ञात गाय ,बैल बळी देत असत. सिंधू संस्कृती मध्ये पाळीव प्राण्यांचे संगोपन केले जात होते. अवैदिकांनी गाय,बैल पशूंचे बळी जाणे रोखले. वैदिक व अवैदिक यांच्यामध्ये पशु बळीमुळे संघर्ष झाले. कालांतराने वैदिक शाकाहारी बनले. शेतीला पूरक अशा सर्जा राजाचे कृषी संस्कृतीत फार मोठे उपकार आहेत. आपण गाईला पूजनीय मानतो. परंतु अनमोल पशुधनावर प्रेम करीत नाही.

संपूर्ण भारतभर बैलाच्या साह्याने शेती केली जाते. मनुवाद्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण करून येथील कृषी संस्कृतीचे सण कलुषीत केले.पोळा हा सण महाराष्ट्रात, कर्नाटकात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कर्नाटकात या सणाला बेंदूर असे म्हणतात.बेंदूर म्हणजे ‌ बैल होय. भारतात मातृसत्ताक पद्धती असल्याने महापराक्रमी महिलांचे पूजन केले जात असे. आजही माता जिजाऊ, अहिल्याबाई, ताराबाई, सावित्रीबाई फुले अशा मातांचे देशावर उपकार आहेत. त्यांचे स्मरण सदैव केले पाहिजे. हेच बहुजनांची दैवते आहेत. म्हणून पूर्वी या सणांच्या दिवशी मातृपूजन केले जात होते. आपल्या संस्कृतीत निऋती ही मातृसत्ताक देवी मानली जाते. शंकर म्हणजेच महादेव हा ऋषभ म्हणजे बैल याला वाहन म्हणून मानणारा देव मानला जातो
महादेव कृषी संस्कृतीची देवता होती.पोळा हा सण अमावस्येच्या दिवशी येतो. या दिवशी पिठापासून बनवलेल्या देवता ‌ व त्यांचे पूजन केले जात होते. पिठापासून केलेले नैवेद्य बनवले जात असत. अवैदिक म्हणजे मूळ भारतीय हे अमावस्येला पवित्र मानीत असत. बहुजनांच्या महापुरुषांनी अमावस्येच्या दिवशी युद्ध केल्याचे इतिहासात नोंद आहे. दिवाळी हा सण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. अमावस्या बद्दल सनातनी लोकांनी अपवित्र दिवस घोषित केलेला आहे. बहुजन हे कर्म प्रधान होते. त्यामुळे कर्मठ विचारांना महत्व देत नव्हते. आर्यांनी निर्माण केलेल्या चमत्कारिक गोष्टींनी परमार्थ परंपरेत थोतांड निर्माण झाले. शेतीच्या शोधापासून बैल हा मानवाला मदत करीत आलेला प्राणी आहे. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहुजनांनी हा सण सुरू केला. बैलाला या दिवशी अंघोळ घालून त्याला रंगरंगोटी करून म्हणजेच सजवून त्याला गावामध्ये फिरवून त्याला पुरणपोळीचा , दही भाताचा, खीर पुरीचा नैवेद्य दिला जातो. नैवेद्य गेल्या अगोदर त्याची कृतज्ञता म्हणून पायावर पाणी टाकून पूजा केली जाते.आज आधुनिक युगात शेतीची साधने वाढली तरी बैलाची गरज संपलेली नाही. शेतकऱ्याच्या या मित्राने त्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. सर्जा राजाची उतराई मानव मरेपर्यंत करू शकणार नाही. सर्जा राजा ने आपल्या मालकाकडे जे उपलब्ध असेल त्यावर गुजराण केली. अतोनात कष्ट घेऊन शेतकऱ्याला समृद्ध बनविले. शेतकऱ्याचे कष्ट त्याने वाचविले. शेतकऱ्याने कधी त्याला रागावली असेल ,मारले असेल त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे पोळा हा सण आहे. पोळा शब्द पोळ म्हणजे बैल या अर्थाने आलेला आहे.पोळ याचा अर्थ सोडलेला बैल. परंतु हा सोडलेला बैल नसून मानवाला मदत करणारा सखा आहे.पोळ शब्दावरून पांझरपोळ शब्द तयार झाला. बैलाच्या कृतज्ञतेवर अनेक कविता, कथा लिहिल्या गेलेल्या आहेत.अनेक चित्रपटात त्याची महती सांगितलेली आहे. आज पशुधनाची खूपच कमतरता झालेली आहे. पशुंना खाण्यासाठी योग्य कुरणे राहिली नाहीत. पशूंची हेळसांड होते. पूर्वीच्या लोकांनी पशुधन सांभाळले. आज पशुधनासाठी मेहनत घेण्याची जरी तयारी असली तरी योग्य खाद्य उपलब्ध होत नाही होत नाही. पूर्वी जंगलामधील चाऱ्यामुळे पशुधन पोसले जात होते. निकृष्ट दुधाच्या विक्रीवरून पशुधन कमी झाल्याचे दिसून येते. देशात ५०% दुधाचा साठा असताना दुधात भेसळ होऊन संपूर्ण भारतात दुध विकले जाते. बैलासारखे संपूर्ण आयुष्य आपल्या मालकाला समर्पण करणारा प्रामाणिक प्राणी बैल आहे. आपल्या अंगावरच्या चामड्याने आपल्याच मालकाला पादत्राणे घालायला देणारा दानशूर प्राणी होय. आज बऱ्याच ठिकाणी या बैलांची शर्यत लावून त्यांच्या जीवाशी खेळले जाते. कवियत्री बहिणाबाई यांनी सर्जा राजावर सुंदर कविता लिहिलेली आहे. ज्याने आयुष्यभर कर्म हा दागिना आपल्या धन्यासाठी समर्पित केला. पिढ्यान पिढ्या गाय,बैलाने मानवासाठी खर्च केलेल्या आहे. त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने, अहिंसेने मानवाने वागण्याची गरज आहे. मुके प्राणी त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाही . त्यामुळे त्यांना स्वतःहून समजून घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *