भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस (शिक्षक-दिन) म्हणून भारतभर पाळण्यात येतो. आपल्या गुरूकडून आपल्याला जे मार्गदर्शन मिळते त्याबद्दल त्यांचे विषयी कृतज्ञता बाळगण्याची ही संधी असते.
शिक्षकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा हा दिवस तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला कोणती शिकवण दिली व ती शिकवण तुम्हाला तुमच्या जीवनात कशी उपयोगी पडली, याचा विचार करून शिक्षकांविषयी आदर भाव बाळगण्याचा हा दिवस आहे.
गुरुविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण न होय जगी सन्मान -ही वस्तुस्थिती असते. भारतीय संस्कृती आईनंतर गुरुलाच महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आई मुलांवर जसा संस्कार करते तसेच मुलांना जीवनात उभे राहण्याचे आल्या, प्रसंगाला सामर्थ्याने तोंड देण्याचे धडे गुरु कडूनच मिळत असतात. त्यामुळे शिक्षक – दिनास आपण आपल्या जीवनात स्थान दिले पाहिजे.
शिक्षण हे सर्वात मोठे वरदान आहे .ते मानवात परिवर्तन घडवून आणण्याचे माध्यम आहे. विकासाचा मूलमंत्र शिक्षण हाच असतो. ते देण्यात शिक्षकांची भूमिका फार मोलाची असते. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो कारण तो सतत कुणाकडून काही ना काही शिकत असतो. जगात सर्वात दीर्घायुष्य कोण आहे ,या प्रश्नाचे उत्तर शिक्षक आहे .असे कथाकार व. पु.काळे यांनी लिहून ठेवले आहे, ते अगदी खरे आहे. कारण शिक्षकांच्या शिकवणुकीची आठवण विद्यार्थ्यांना जन्मभर साथ देत असते. शिक्षक तुम्हास प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सक्षम करीत असतो.तो तुमच्यातील ज्ञान व कौशल्य वाढवीत असतो. विद्यार्थ्यांना अपूर्णाला पूर्णत्व देत असतो.आयुष्यात कधी हार मानू नका तर अडचणींना सामोरे जा याचा धडा देत असतो. म्हणून ज्योतिबा फुले यांनी सांगितले की विधेविना मती गेली,मती विना नीती गेली, नीतीविना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना सारे खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले. तेव्हा अविद्या दूर करण्यासाठी विद्येची कास धरायला हवी. ती विद्या गुरु कडून प्राप्त केले तरच ती खऱ्या अर्थाने मनात पक्की रुजत असते तेव्हा शिक्षक हेच खऱ्या अर्थाने पथप्रदर्शक असतात.
राष्ट्राच्या प्रगतीचे आधार स्तंभ शिक्षक असतात .म्हणून देशाच्या जडणघडणीत मुलाचे योगदान देणाऱ्या ज्ञानाची खऱ्या अर्थाने उपासना करणाऱ्या, अध्यापनाद्वारे समाज जीवनास पवित्र्याचा व मांगल्याचा स्पर्श घडून राष्ट्र निर्मितीसाठी युवकांची निर्मिती करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक अभिवादन.
प्रा. सुनिता पवार
श्री. म. ना. मा. व उच्च मा. वि.गुंज









