पाणीपट्टी थकबाकी 16 कोटींपेक्षा अधिक – पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज
पुसद (प्रतिनिधी) — महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग पुसद यांच्या मार्फत माळपठार 40 गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून, या योजनेद्वारे माळपठार परिसरातील 41 गावांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अनेक गावांतील नळधारकांकडून पाणीपट्टीचा भरणा न झाल्यामुळे या योजनेवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
या योजनेअंतर्गत रेवरा, मोप, खैरखेडा, आडगाव, शाहवळणी बु., शाहवळणी खु., खांडाळा, अमृतनगर, जवळी, सावरगाव गोरे-रामपूरनगर, दुर्गाशगिरी, देवठाणा, नांद-2, जवळा, जामनाईक-1, जामनाईक-2, झुलवाडी, लोहारा (ई), सेवानाईक नगर, सावरगाव बंगला, इनापुर, बेलोरा बु., बेलोरा खु., पांढुर्णा बु., रोहडा, कुंभारी, हनुमाननगर, पिपळगाव, आमटी, मारवाडी बु., वासंतवाडी, हनवतखेडा, नांदुरा, मारवाडी खु., कन्हेरवाडी, सत्तरमाळ, वाघजाळी, आसोला तांडा, मांजरजवळा बु., मांजरजवळा खु., पन्हाळा आणि म्हैसमाळ या गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मार्च 2025 पर्यंत या योजनेतील थकीत पाणीपट्टीची एकूण रक्कम तब्बल रु. 16,21,14,777/- इतकी झाली आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षातील थकीत पाणीपट्टी रु. 1,15,00,556/- इतकी आहे. इतक्या मोठ्या थकबाकीमुळे योजनेच्या दुरुस्ती, देखभाल व पाणीपुरवठा व्यवस्थापनावर परिणाम होत आहे.
योजनेद्वारे सातत्याने पाणीपुरवठा करण्यासाठी व देखभाल खर्च भागविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आवाहन आहे. त्यामुळे सर्व नळधारकांनी आपल्या थकीत पाणीपट्टीची रक्कम तात्काळ भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. प्रफुल्ल व्यवहारे, कार्यकारी अभियंता, आणि श्री. स्वप्नील राठोड, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग पुसद यांनी केले आहे.
प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाणीपुरवठा योजना सुरळीत चालण्यासाठी निधीची आवश्यकता असते. नागरिकांकडून वेळेत पाणीपट्टी भरली गेल्यास योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व पाणीपुरवठा सुरळीतपणे राखणे शक्य होते. त्यामुळे सर्वांनी आपला नागरिकत्वाचा धर्म पाळत थकबाकी तात्काळ भरावी.”
तसेच, जर थकबाकीची रक्कम नियोजित वेळेत भरली गेली नाही, तर येत्या काळात काही गावांचा पाणीपुरवठा अडथळ्यांत येऊ शकतो, असा इशाराही प्राधिकरणाने दिला आहे.
माळपठार पाणीपुरवठा योजनेद्वारे हजारो नागरिकांना दररोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळते. या योजनेची सातत्यता आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी नागरिकांचे वेळेवरचे सहकार्य अत्यावश्यक आहे.








