पुसद (प्रति) : दिनांक १५ डिसेंबर २०२५, सोमवार रोजी श्री क्षेत्र श्री महाकाली संस्थान, श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम, नंदलाल गौरक्षण कासोळा देव (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे होणाऱ्या महाकाली मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून परिसरातील अनेक गावांत भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या सोहळ्याचे निमंत्रण प. पु. समर्थ सद्गुरु श्री गजानंद माऊली यांच्या शिष्य परिवाराकडून तालुक्यातील कोलार, हळदा, पिंप्री, गिरोली, खापरदरी, गिराटा, भिलडोंगर, शेंदुरजना, पाळोदी, उज्वलनगर, कुपटा, इंझोरी, दापुरा बु., दापुरा खु., भोयणी आणि मानोरा शहर अशा अनेक गावांमध्ये घरपोच देण्यात आले. या निमंत्रणाला गावागावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्राणप्रतिष्ठेत महाराष्ट्रात प्रथमच कृष्णशीला दगडापासून साकारलेली महाकाली मातेची मूर्ती अभयमुद्रा व वरदहस्तमुद्रेत प्रतिष्ठापित होणार आहे. या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा व्यक्त केली जात आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मृद व जलसंधारण कॅबिनेट मंत्री तथा यवतमाळ जिल्हा पालकमंत्री संजय राठोड, तसेच राज्यमंत्री व गोंदिया जिल्हा पालकमंत्री इंद्रनिल नाईक यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. राज्यातील अन्य मान्यवर, खासदार, आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांतूनही हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अभिजीत मुहूर्तावर सकाळी ९.३० वाजता पार पडणार असून यानंतर महाआरती व महाप्रसाद आयोजित आहे.
या पवित्र, भव्य दिव्य सोहळ्यास सर्व श्रद्धावानांनी उपस्थित राहावे, असे आवाहन
श्री क्षेत्र श्री महाकाली संस्थान व श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम, नंदलाल गौरक्षान कासोळा देव यांच्यावतीने करण्यात आले आहे.








