पुसद : पुसद तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काही खासगी दवाखाने व रुग्णालयांकडून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूटमार सुरू असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.) यांनी केला आहे. रुग्णांच्या नावाखाली अवाजवी रूम भाडे आकारणे, अनावश्यक तपासण्या लावणे, जादा बिलिंग करणे तसेच शासकीय आरोग्य योजनांचा गैरवापर करणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः शासकीय योजनेंतर्गत रुग्ण भरती झाल्यानंतर, रुग्ण २–३ दिवसांत बरा झाला असतानाही त्याला मुद्दाम ७–८ दिवस रुग्णालयात ठेवून शासनाकडून जादा बिल उकळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार म्हणजे शासन आणि जनतेची सरळ फसवणूक असून गरीब, शेतकरी, कामगार व मध्यमवर्गीय कुटुंबांवर मोठा आर्थिक भार टाकणारा आहे.
या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.) यांच्या वतीने शिष्टमंडळाने मा. वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय पुसद तसेच मा. तालुका आरोग्य अधिकारी, पुसद यांना निवेदन सादर केले. संबंधित रुग्णालयांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर विशेष नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही तर भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.) यांच्या वतीने जनतेच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष यवतमाळ अशोक भाऊ भालेराव, आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ राजकुमार भगत, तसेच आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हा महासचिव विशाल भाऊ डाके, प्रशिक कांबळे,अनिल कांबळे, आकाश चवरे,उपस्थित होते.







