Home » व्यवसाय » महानायक वसंतराव नाईक यांच्या विचारांना उजाळा — बाल्कनीत जैविक परसबागेचा आदर्श

महानायक वसंतराव नाईक यांच्या विचारांना उजाळा — बाल्कनीत जैविक परसबागेचा आदर्श

Share:


पुसद तालुका प्रतिनिधी :
शहरी जीवनशैलीत आरोग्यदायी अन्नाचा प्रश्न गंभीर होत असताना, महानायक वसंतराव नाईक परसबाग उपक्रमांतर्गत श्रीपाद राठोड (नागपूर )यांच्या घरच्या बाल्कनीत साकारलेली जैविक परसबाग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. रासायनिक फवारणीविरहित भाजीपाला उत्पादनाचा हा प्रयोग नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या परसबागेला भेट देण्यासाठी डॉ. स्व. रामराव महाराज फेडरेशन चे प्रचारक तसेच बाबासाहेब कृषी विज्ञान केंद्र हूडी चे अध्यक्ष विजय राठोड, सामाजिक कार्यकर्ते व माजी जि.प. सदस्य रामराव चव्हाण, तसेच भारत घोगरे महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थिती लावली.
परसबागेचे यजमान श्रीपाद राठोड यांनी पाहुण्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी न करता पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने भाजीपाल्यांची लागवड करता येते. घराच्या बाल्कनीत कमी जागेतही आरोग्यदायी अन्न उत्पादन शक्य असून, यामुळे कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
“परसबाग असावी दारी , आरोग्य तिथे वास करी”
या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत त्यांनी सेंद्रिय खत, पुनर्वापर केलेली भांडी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन यांचा वापर करून परसबाग विकसित केली आहे. नागरिकांनी घरीच स्वच्छ, सुरक्षित अन्न पिकवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
फवारणीयुक्त अन्नामुळे वाढते आजार
तज्ञांनी सांगितले की, रासायनिक फवारणी केलेल्या भाजीपाल्यामुळे कॅन्सर, मधुमेह व इतर जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे जैविक शेती ही केवळ पर्यावरणपूरक नाही तर आरोग्यरक्षणासाठीही अत्यावश्यक ठरत आहे.
“पाणी आडवा, पाणी जिरवा”ला पुन्हा चालना
या उपक्रमातून जलसंवर्धन आणि जैविक क्रांती या दोन्ही संकल्पनांना नव्याने उजाळा देण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, स्वर्गीय माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि स्वर्गीय माजी मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांनी दिलेल्या शेतीकेंद्रित विकासाच्या विचारांपासून समाज दूर जात असल्याची खंत असून, अशा उपक्रमांतून त्या विचारांना पुन्हा बळ मिळू शकते.

शहरी भागातही जैविक परसबाग ही आरोग्य, पर्यावरण आणि स्वावलंबन यांचा संगम ठरू शकते, हे श्रीपाद राठोड (नागपूरकर) यांच्या प्रयोगातून स्पष्ट झाले असून, नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *