प्राचीन काळामध्ये सिंधू संस्कृतीत आनंद व्यक्त करण्यासाठी एकमेकातील द्वेष , वैरभाव नष्ट होण्यासाठी धुळवडीच्या सणाची निर्मिती झालेली आहे. हा सण उत्सवाच्या रूपामध्ये साजरा केला जातो. मध्यप्रदेशातील रामगड येथील शिलालेखात रंगपंचमी खेळताना दोन युवतीचा शिलालेख आढळतो. तो शिलालेख २७०० वर्षापूर्वीचा आहे. श्रीकृष्ण हा लोकांमध्ये प्रेम, आदर ,सन्मान, स्नेह निर्माण करणारे व्यक्तिमत्व आहे. जगातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र देऊन विचार करण्याची गरज असते. श्रीकृष्णांनी लोकांच्या मदतीने अनेक कार्य केल्याची नोंद आहे. श्रीकृष्णाची प्रेम हे अलौकिक होते. श्रीकृष्ण चरित्र बहुजनाचे चरित्र आहे. होळीच्या पूजनानंतर दुसऱ्या दिवशी येणारा धुलीवंदनाचा हा सण होय.धुळ म्हणजे माती व वंदन म्हणजे नमन करणे, नमस्कार करणे. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळी जाळल्या नंतर शिल्लक राहिलेल्या राखेला एकमेकांच्या अंगावर उडविण्याचा आनंदाचा उत्सव म्हणजे धुलीवंदन होय. पुढे त्याला रंगपंचमी चे स्वरूप निर्माण झाले. मातीचे रंग एकमेकांच्या अंगावर उधळण्याचा हा सन निर्माण झाला. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपले भावनिक नाते अधिक स्नेहांकित होण्यासाठी धुलीवंदन हा सण आहे. त्यामुळेच श्रीकृष्ण व राधा यांच्या दिव्य प्रेमाचे प्रतीक म्हणून धुलिवंदन सण साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने हा मोठा उत्सव आहे. सामूहिक रित्या साजरा होत असल्याने याला उत्सव म्हटले जाते. जीवन जगत असताना अनेक लोकांचे आपले वाद होतात. एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो. तो दुरावा मिटविण्यासाठी एकमेकांच्या घरी जाऊन निसर्गाने निर्माण केलेल्या विविध रंगात न्हाऊन आनंद व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. जीवन हे क्षणभंगुर आहे त्या जीवनामध्ये आपल्या सोबत जगणाऱ्या लोकांना आपण प्रेमाने सामोरे गेले पाहिजे हा उद्देश ठेवून हा उत्सव साजरा केला जातो. प्रत्येक राज्यामध्ये धुलिवंदन अथवा रंगपंचमी हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आदिवासी लोकांपासून ते बंजारा लोकांपर्यंत धुलीवंदन हा उत्सव सर्व लोक एकत्र येऊन साजरा करीत असतात. कुणावरही राग, द्वेष न ठेवता आनंदाने एकमेकांना रंग लावण्याचा हा सण आहे. आपल्याला मिळालेले जीवन कायम नाही. कधी ना कधी हा इहलोक जायचे आहे त्यामुळे आपण एकमेकांमध्ये द्वेष,मद,मोह, मत्सर,वैर न ठेवता प्रेमाने जगून आनंद घ्यावा हा पवित्र उद्देश या सणाचा आहे. हा सण वैयक्तिकरित्या सुद्धा साजरा होतो त्यामुळे या दिवसाला सण व उत्सव अशा दोन्ही स्वरूपाचे नाव आहे. जगातल्या सर्व समस्या युद्धाने मिटविल्या जाऊ शकत नाही. युद्धाच्या जागेवर प्रेम असेल तर समस्या सुटू शकतात. आपण प्रत्येक वेळी प्रेमाच्या, आपुलकीच्या ,स्नेहाच्या भावनेने संवाद एकमेकांशी साधल्यास अनेक समस्या मिटू शकतात. जगातील अंतिम सत्य समाधान प्रेमात आहे. महापुरुषाला जगाला प्रेम दिले. अहिंसा ही प्रेमाकडे जाणारी वाट आहे. धुलीवंदनाच्या दिवशी रासायनिक रंगाचा वापर करून तयार केलेले रंग एकमेकांना लावत असतात. त्यापेक्षा मातीच्या रंगाने आनंद व्यक्त करणे हा महत्त्वाचा आहे. राजस्थान ,उत्तर प्रदेश या प्रदेशात आपल्याला मातीचा रंग उधळल्याचा अनुभव येतो. बंजारा समाजात खूप मोठ्या प्रमाणात होळी साजरी केली जाते. निसर्गाने हंगाम दिल्यानंतर कृषी संस्कृतीत आनंद व्यक्त करण्याची परंपरा होती. लोक गुण्या गोविंदाने नांदत होते. कृषी संस्कृतीवर आधारित सर्व सण होते. कृषी संस्कृतीच्या सणांमध्ये पूजापाठ करण्याऐवजी सामूहिक एकत्रित येऊन आनंद व्यक्त करण्याची परंपरा होती. होळी या दिवशी गावातील सर्व कुटुंबात पुरणपोळी व खीर करून ज्या कुटुंबांत गोडधोड होत नव्हते त्यांना आनंदाने जेऊ घालण्याचा प्रघात होता. गावातील कोणीही भुकेल्यापोटी झोपू नये याची दक्षता तेथील लोक घेत होते. कोणत्याही प्रकारचा अवाढव्य खर्च करून हा उत्सव साजरा होत नसल्याने सर्व समाज बांधव एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. आपापल्या नात्यांमधील जिव्हाळा कायम टिकवण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!.








