Home » जीवनशैली » सामाजिक » मुंबईत सकल बंजारा समाजाचा एल्गार : विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन

मुंबईत सकल बंजारा समाजाचा एल्गार : विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन

Share:

वसुंधरा न्यूज
मुंबई : सकल बंजारा समाजाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले असून राज्यभरातील बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या आंदोलनामध्ये बंजारा समाजाला आदिवासी (एसटी) आरक्षणाच्या सर्व सवलती तात्काळ लागू कराव्यात, आत्मग्रस्त कुटुंबांना आर्थिक व शैक्षणिक मदत द्यावी, तसेच आंदोलनाशी संबंधित सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. प्रत्येक तांड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करून तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय, बंजारा समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक महामंडळ यांना ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा व त्यामध्ये समाजातील सदस्यांचा समावेश करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी विशेष शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
बंजारा भाषेला आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच हैदराबाद गॅझेट व सीपी बेरारच्या आधारे बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कर्नाटकसह इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही सर्व सवलती लागू कराव्यात, असेही आंदोलकांचे म्हणणे होते.
या आंदोलनाचे नेतृत्व विनोद विश्वनाथ आडे व हरीश श्रीराम राठोड यांनी केले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांनीही बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री यांना अर्ज सादर केल्याचे सांगितले.
सकल बंजारा समाज महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *