आपल्या अस्सल मराठवाडी आणि खानदेशी बोलीने मराठी साहित्य क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धों. महानोर दादांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेड तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका सामान्य शेतकरी, शेतमजूर कुटुंबात झाला.
पळसखेड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदेशच्या (जळगाव जिल्ह्याला ) सीमेला लागून असलेले लहानसे गाव. पाण्याच्या दुर्भिक्षाने शेतशिवार तहानलेले ओसाड आणि कोरडे. पाऊस पडला तर शेती हिरवी होणार .अन्यथा शेत – शिवार आणि माणसेही कोरडीच….!
अशा कुटुंब आणि नैसर्गिक प्रदेशातून या निसर्ग कवीची जडणघडण झाली. श्रद्धेय महानोर दादांचे प्राथमिक शिक्षण पळसखेड आणि पिंपळगाव येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते जळगावला आलेत. मुळजी जेठा महाविद्यालयात त्यांनी प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. परंतु घरच्या परिस्थिती मुळे त्यांना एका वर्षाच्या आतच आपले महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण सोडून पळसखेडला जावे लागले. गावी आल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी त्यांनी वडिलांसोबत शेतीत काम करायला सुरुवात केली. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना खऱ्या अर्थाने अधिक वेळ मिळू लागला. निसर्गाची विविध रूपे ती जवळून पाहू लागले. अनुभव लागले. कोरडवाहू शेती समोर दिसणारा अजिंठ्याचा स्थितप्रज्ञ डोंगर आणि आपले म्हणजेच शेतकऱ्याचे भविष्य दादा या रानशिवारात बघू लागले. शेतीमातीशी त्यांचा मुक्त स्वसंवाद होऊ लागला आणि बघता बघता हा संवाद कवितेच्या आणि गाण्याच्या माध्यमातून अक्षरबद्ध झाला.
त्यांच्या कवितेतून शेत, शिवार , रान , झाडे, वेली , नद्या, नाले,ओढे , पशु पक्षी, गुरे ढोरे, खंगलेली माणसे सारेच प्रतिमा प्रतिकांच्या माध्यमातून जीवनातील वास्तव सत्य मांडू लागले. जसजशी ही रानातली कविता पुस्तकांच्या माध्यमातून, काव्य मैफिलीच्या माध्यमातून ग्रामीण नागर आणि महानगरी जीवनाकडे जाऊ लागली तसतशी या कवितेची लोकप्रियता आणि कवी बद्दलची लोकप्रियता झपाट्याने वाढू लागली. त्यांच्या कवितेला रानाचा लळा होता म्हणून त्यांच्या कवितेने महाराष्ट्राला लळा लावला होता ….
या शेताने लळा लावीला असा असा की
सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो
आता तर हा जीवच अवघा असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो
रानातल्या कविता (१९७५) या काव्यसंग्रहातील श्रद्धेय महानोर दादांच्या हस्ताक्षरातली ही पहिलीच कविता सर्वांना जखडून टाकणारी आहे. शेतशिवारात राबणाऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांना ती आपली वाटत होती तशीच गाव सोडून नगरात आणि महानगरात उंच उंच घरात राहणाऱ्या माणसांनाही ती आपलीच वाटत होती.
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू नको कमळनबाई
एकांताच्या कोणी
रूपखणी अंगावरली
सखे लावण्याची खाणी
आदरणीय महानोर दादांचं वाड: मयीन संचित म्हणाल तर त्यांच्यावर झालेला लोकसाहित्याचा आणि लोकतत्वांचा संस्कार आहे . आपल्या आई,काकू यांच्यासारख्या अनेक महिलांच्या मौखिक साहित्यातून त्यांची प्रतिभा एक अनोखी शैली घेऊन व्यक्त होत होती. गाव खेड्यातील माणसे साधी – सरळ व निर्मळ मोकळ्या मनाची असतात. दादाही त्याला अपवाद नव्हते. त्यांचेही व्यक्तिमत्व असंच अघड पघड आणि वाहत्या झऱ्यासारखं निर्मळ होतं.पळसखेडच्या शेतातल्या आठवणी,अनुभव तर त्यांच्या बोलण्यातून ओसंडून वाहत असत .
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्य अशी येते फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
असं मनाला भावणार आणि शेत शिवाराचं नैसर्गिक चमत्कारिक रूप मानणार हे काव्य फक्त आणि फक्त महानोर दादांच्या प्रतिभेतून आविष्कृत झालेले दिसते.
निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी, निसर्गकवी बालकवी यांचा साहित्यिक वारसा खऱ्या अर्थाने महानोर दादांनी आणि त्यांच्या कवितेने साऱ्या महाराष्ट्र आणि मराठी मातीला दिला. आपल्या कवितेने दादांना यश – कीर्तीच्या उंच उंच शिखरावर पोहचविले. पण दादांचे पाय आणि मन मात्र सतत पळसखेडच्या शेत शिवारामध्येच रमले. ती भावना व्यक्त करताना ते लिहितात –
गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
निसर्ग आणि शेती हा दादांचा जगण्याचा आणि साहित्याचा श्वास होता . त्यामुळे आयुष्याच्या अखेरपर्यंत ते आणि त्यांची कविता याच केंद्राभोवती जीवनाचे विविध रूपे आपल्या प्रतिभेतून आविष्कृत करीत राहिली.
रानातल्या कविता १९६७, वही १९७०, पावसाळी कविता १९८२ , लोकगीतांचे संकलन असलेली पळसखेडची गाणी १९८२ , पक्ष्यांचे लक्ष थवे १९८२, गावातल्या गोष्टी आणि गपसप १९८१, गांधारी १९६२ , अनेक मराठी चित्रपटांना दादांच्या गीतांनी लोकप्रिय केलेले आहे. त्यांच्या साहित्याने मराठी साहित्यात निसर्ग साहित्याचं एक दालन समृद्ध तर केलेच परंतु त्यासोबतच गाव खेड्यात राहणाऱ्या माणसाच्या भावभावनांना निसर्गाच्या प्रतिमा आणि प्रतिकांमधून किती सुंदर शब्दात व्यक्त करता येते याचे आदर्श उदाहरण म्हणजे दादांच्या काव्य आणि गीत रचनेचा आस्वाद घेतल्यावर लक्षात येते.
राज्य आणि देश पातळीवरील साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांनी त्यांना वेळोवेळी सन्मानित करण्यात आले हा गौरव जसा त्यांच्या साहित्याचा होता तसा असतो शेतीमातीशी इमान ठेवून राबराब राहणाऱ्या एका अस्सल भूमिपुत्राचा होता.
आपल्या विधान परिषदेवरील दोन दशकांच्या आमदारकीच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विधिमंडळात शेती- शेतकरी आणि शेतमजूर या संदर्भातले विकासाचे विचार त्यांनी मांडले . आज ही ते महत्त्वाचे ठरतात. पाणी आडवा- पाणी जिरवा , ठिबक सिंचन तंत्राचा प्रसार आणि प्रचाराची गरज, लघु आणि मध्यम सिंचनाचे प्रकल्प उभे राहिले पाहिजेत यासाठी त्यांनी वेळोवेळी शासनाला केलेले मार्गदर्शन हे आजही मार्गदर्शक आहेत.
मराठवाड्याच्या मातीत जन्मलेल्या आणि खानदेशच्या भूमीत फुललेल्या या निसर्ग कवीने अखेरचा श्वास घेतला तो ही पावसाळी वातावरणात ०३ ऑगस्ट २०२३ रोजी .
शेतीमातीशी इमान ठेवणाऱ्या या रानकवींची कविता त्यांच्या ओठातून जवळपास पाच दशके मराठी माती आणि मन आणि संस्कृतीला उन्नत करीत होती ….पुढेही तिचा प्रवास असाच निरंतर सुरू राहील !
झऱ्या सारखं निर्मळ व्यक्तिमत्व असलेल्या श्रद्धेय महानोर दादांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
– प्रा. डॉ. जतीन मेढे ,भुसावळ
९५४५०७२६००








