प्रत्येक देशात आदिवासी जमात ही काटक, कष्टाळू, स्वाभिमानी जमात म्हणून ओळखली जाते. आदिवासी म्हणजे या देशातील मूळ रहिवास असलेले लोक होय. बऱ्याच टोळ्या विदेशातून येऊन भारतामध्ये स्थिरस्थावर झाल्या . सर्वप्रथम भारतामध्ये आर्य आले. त्यानंतर मोगल आले . त्यानंतर फ्रेंच ,डच, इंग्रज भारतामध्ये येऊन राज्यकारभाराची लालसा मनात ठेवून येथे राज्य करू लागले. आदिवासी हे या देशातील मुलनिवास करणारी आहेत.जर्मन येथून आलेल्या टोळ्या तसेच रोमन कॅथलिक धर्माचा प्रचार करणारे इंग्रज सुद्धा जम बसवू लागले. इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले. भारतावर इंग्रजांची सत्ता होती त्यावेळी इंग्रज लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी गरीब, नादार,वंचित, कष्टकरी समाजापर्यंत जाऊन त्यांना आपल्या धर्माचे अनुयायी करीत असत. अशा काळामध्ये मुंडा जमातीमध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जिल्हा बंगाल आताचे झारखंड राज्य येथील मुली उलिहातू या गावात झाला. बिरसा मुंडा चे गाव जंगलाजवळ होते. दररोज त्यांचे वडील व आई कष्ट करून पोट भरत असे. जंगलातील विविध सरपण,डिंक, औषधी विकून उदरनिर्वाह करीत असत. बिरसा मुंडा यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा होते. आईचे नाव करमी मुंडा होते. आई व वडील यांच्या संपर्कामध्ये जर्मन मिशनरी आल्याने त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.
. आदिवासी मुंडा जमातीला हाताला काम देण्यासाठी मिशनरी पुढे आले. मिशनरी लोकांनी आदिवासी मुंडा जमातीतील लोकांना ख्रिश्चन बनवणे चालू ठेवले. काही विद्यार्थ्यांना जर्मन मिशनरी स्कूलमध्ये दाखल केले. त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागे. या अटीतून बिरसा मुंडा यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूलमध्ये सालगा या गावी झाले. बिरसा मुंडा काही वर्ष शाळा शिकल्यावर त्याला चांगल्या पद्धतीने इंग्रजांची नीती समजून आली. इंग्रज लोक आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना देऊन नफा कमवित असत. आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांच्या ताब्यात गेल्याने आदिवासी भूमिहीन झाला. आदिवासी लोकांचे अस्तित्व डळमळीत झाले. इंग्रजांनी भारतामध्ये गोरगरीब , कष्टकरी, आदिवासी लोकांवर दडपशाही सुरू केली. अशा काळामध्ये बिरसा मुंडा ने अनेक आदिवासी लोकांना एकत्रित करून १८९९ ला उल गुलान नावाची चळवळ उभी केली. या चळवळीने गनिमी काव्याने लढून इंग्रजांना जेरीस आणले. आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या ताब्यात येऊ लागल्या. बिरसा मुंडा व त्यांचे सहकारी यांनी इंग्रजांच्या पोलीस व सरकारी इमारतीवर हल्ले केले. इंग्रजांवर बिरसा मुंडा व त्यांच्या उल गुलान चळवळीने सळो की पळो करून सोडले. आदिवासींना सावकार लोक पैसे देऊन जमिनी ताब्यात करून घेत असत. सावकारांविरुद्ध बिरसा मुंडा यांनी आवाज उठविला. इंग्रजांच्या अनेक ठिकाणच्या रेल्वे गाड्या व धान्याचे कोठार यांच्यावर हल्ले चढविले. कमी संख्या असलेल्या उल गुलान चळवळीने इंग्रजांना जेरी आणले होते. आदिवासी मधून अनेक युवक देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देत होते. अनेक लोकांना इंग्रजांनी त्रास दिलेला होता. अशा लोकांना बिरसा मुंडा यांनी मदत केली. इंग्रजांचे अनेक मनसुबे नष्ट केले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात बिरसा मुंडा यांचे अप्रतिम योगदान आहे. जीवाची पर्वा न करता बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध मोठी सेना उभी केली होती. सर्व सेनेवर बिरसा मुंडांनी चांगले संस्कार केलेले होते. सामान्य जनतेला कोणताही त्रास न होता बिरसा मुंडा सेनेने इंग्रजांवर हल्ले केले. बिरसा मुंडा यांना शिक्षणासाठी जयपाल नाग ह्या गुरुची मदत झाली. शाळेमध्ये शिक्षणाबरोबर स्वतःच्या जीवनाचे संरक्षण कसे करावे याचेही ज्ञान मिळाले. बिरसा मुंडा यांच्या सेनेला सर्व प्रकारची आयुधे चालविता येत असत. तीर कामठा ह्या आयूधाचा वापर करून जंगलामध्ये लपून बसत असत. इंग्रजांच्या सेनांवर गनिमी काव्याने युद्ध करीत असत. बिरसा मुंडा यांच्या सेनेने इंग्रज दास्तावलेले होते. बिरसा मुंडा यांना पकडून देणाऱ्या लोकांना बक्षिसे जाहीर केलेली होती. बिरसा मुंडा यांना त्यांच्या लोकांनी पृथ्वीचा पिता ही उपाधी दिलेली होती. पृथ्वीचे म्हणजेच भारत मातेचे रक्षण करण्यासाठी बिरसा मुंडांनी सर्वस्व अर्पण केले. बिरसा मुंडा यांनी आपल्या आदर्श शंबूक व एकलव्य यांना मानले होते. आदिवासी म्हणजे जे पृथ्वीवरील मुळनिवासी होय. अनेक टोळ्यांची युद्ध करून त्या टोळ्यांचे गुलाम न होणारी जमात म्हणजे आदिवासी होय. अशा लोकांनी आजही निसर्ग सुंदर बनविलेला आहे. निसर्गाचे खरे रक्षणकर्ता आदिवासी लोक आहेत. त्यांनी निर्माण केलेली सभ्यता आजही टिकून आहे. आदिवासींनी जंगलात राहणे पसंत केले परंतु ते गुलाम झाले नाहीत. जंगलाचे खरे राजे आदिवासी होत. जंगलाला चांगल्या पद्धतीने सांभाळणारे संरक्षक म्हणजे आदिवासी होय. आदिवासींमध्ये अजूनही महिलांना हक्क व अधिकार दिले जातात. बऱ्याच ठिकाणी लग्न समारंभ, तसेच इतर कार्यक्रमांमध्ये महिलांना पंक्तीमध्ये प्रथम स्थान दिले जाते. मातृसत्ताक पद्धती सांभाळणारे खरे रक्षक आदिवासी होय. आदिवासींच्या सर्वात जमातीमध्ये प्रामाणिकपणा दिसून येतो. ज्या लोकांवर त्यांनी प्रेम केले त्यांच्यासाठी स्वतःच्या जीवाची ते तमा करीत नाही. जंगलातील रानमेवा अजूनही जपून ठेवण्याचे काम या आदिवासी करीत आहे. तंट्या भिल या स्वातंत्र्यसैनिकाने इंग्रजांविरुद्ध उठा उठा केल्याची नोंद आहे. इंग्रजांच्या खजिन्याची लूट या लोकांनी करून त्यांची रसद खिळखिळी केली होती. जंगलामधून रात्रीच्या वेळी वाट काढणारे आदिवासी होय. आदिवासींनी शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आठवण या भूमीला पुन्हा करून दिली. खऱ्या अर्थाने सर्वांचे संरक्षण करणारी ही जमात आहे. बऱ्याच राज्यात या जमातीवर अन्याय केला जातो. अशा अन्याया विरोधामध्ये ते विद्रोह करीत असतात. बिरसा मुंडाने सशस्त्र इंग्रजांशी लढून स्वाभिमान जागविला. आजही आदिवासी महिलांमधील विनयशीलता, नम्रता, संयम, जिद्द, सभ्यपणा टिकून आहे. जगात सर्वात जास्त स्पष्ट घेणारी ही आदिवासी जमात आहे.हया आदिवासींची संस्कृती जपण्यासाठी त्यांचे देवीच्या अथवा निसर्गदेवतेच्या नावाने यात्रा भरविल्या जातात. या यात्रांमध्ये स्त्री पुरुष समानतेचा प्रत्यय येतो. अशी ही जमात या जमातीला त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या योजना सत्ताधारी करीत असतात. काश्मीर, कोकण, हिमाचल या ठिकाणच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या योजना सत्ताधारी राबवीत असतात. बिरसा मुंडा, तंट्या भिल यांचे भारतावर झालेले योगदान विसरता येणार नाही. आदिवासी आपला आनंद अतिरेकपणाने साजरा करीत नाही. जीवनाचा आनंद घेण्याची त्यांची प्रवृत्ती खासच आहे. आरोग्यासाठी योग्य काळजी ते घेत असतात. परिस्थितीने त्यांना काटकसर शिकविली आहे. काटकसरीतून ते उत्तम आरोग्य ठेवू शकतात. त्यांच्या ताब्यातील जंगले निसटून गेलेली आहेत.अशा आदिवासी जमातींना सांभाळणे आपले कर्तव्य आहे. आदिवासींनी जपलेली सभ्यता जगात श्रेष्ठ आहे. आदिवासी दिनाच्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा








