भंडारी, दि. १० नोव्हेंबर :
भूमिपुत्र गावकरी कर्मचारी वृंद व जि. प. प्राथमिक शाळा, भंडारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीपोत्सव २०२६ – गुणगौरव सोहळा व दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम जि. प. प्राथमिक शाळा, भंडारी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.अनिल पाटील( अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती भंडारी) तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.भिमराव कव्हर, प्रा.डॉ.संतोष पवार, डॉ.तारासिंग आडे (जिल्हा नेत्रचिकीत्सक) हे होते.
दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नविन निवड नियुक्ति मिळवलेल्या, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी, युवक तसेच कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी गुणवंतांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सोबतच नव्या पिढीला असेच यश संपादन करण्यास प्रेरणा मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात दिवाळी पहाट या निमित्यांने सुरमय वातावरण निर्माण करणारे श्री.कॊरटकर सर व गुल्हाणे मॅडम यांच्या संचाचे गायन, संगीत व विविध सांस्कृतिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली होती. या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच दिवाळी स्नेहमिलनातून गावातील एकोपा, सामाजिक सलोखा आणि परस्पर प्रेमभावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची जोपासना करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक वृंद, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकारी, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी आभार मानले.
“संकल्प नवा… एक दिवा… गावासाठी” यामाध्यमातून गावातील प्रतिभेला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक ऐक्य अधिक बळकट करण्याचे कार्य या कार्यक्रमातून साध्य झाले.




