
डॉ. चंदू पवार यांचा मरणासन्न हयातीची आर्जवे हा काव्यसंग्रह नुकताच वाचून काढला. देशाला स्वातंत्र्य मिळूनही इथल्या व्यवस्थेने समाजातील काही भाग अजूनही अत्यावश्यक घटकांपासून दूर ठेवला आहे. हा समाज पूर्वीपासूनच गावपातळीवर नेहमी गावकुसाबाहेर वाळीत टाकल्यासारखा आढळून येतो. वाळीत टाकला होता असा इतिहास आहे तो अजूनही तसाच आहे. या समाजातील लोकांना दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी असेल तितके रक्त आटवून वणवण करावी लागते, जीवघेणा संघर्ष करावा लागतो. तरीही पोटाची भूक मात्र रोज आ वासून समोर उभी असते. आजन्म भुकेचा प्रश्न या तळागाळातील माणसांना सतावत असतो. वरून आणखी त्यांच्या वाट्याला बाह्य जगातील सतत अन्याय, अत्याचार, शोषण, विषमता व जाच येत असतो. धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा इत्यादी अतार्किक शोषण करणाऱ्या घटकांच्या ओझ्याखाली त्यांना दाबून ठेवले जाते. असा समाजातील काही भाग नेहमी मरून पडलेल्या अवस्थेत जीवन जगत असतो. त्याला इथली व्यवस्था तशीच दुर्लक्ष करत आली आहे. अशा घटकातील प्रत्येकाची व्यथा, वेदना, जखमा व त्यांच्या अंतर्मनाच्या हाका डॉ. चंदू पवार यांनी काव्यसंग्रहात पानापानावर मांडल्या आहेत. समाजातील प्रश्न अत्यंत सूक्ष्मपणे दाखवण्याचा संयमाने व करुणतेने कवीने प्रयत्न केलेला असल्याने या काव्यसंग्रहातील कविता अत्यंत उच्च सामाजिक भानातून आलेल्या आहेत. काव्यसंग्रहातील भाषा अगदी साधी सोपी परंतु डोंगराएवढी आशय कवेत घेत आहे. कवी डॉ. चंदू पवार यांनी अशा सामाजिक भानातून काव्यनिर्मिती केल्याचे मूळ कारण म्हणजे त्यांचे जगणे आहे. त्यांनी स्वतः अशा व्यथा भोगल्या आहेत. त्यांनी स्वतः हे सर्व भोगलं आहे. म्हणून लेखणीला प्रभावी शस्त्र बनवून त्यांनी सार्वत्रिकपणे तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे समाजातील खालच्या घटकातील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत जगू पाहणाऱ्या व व्यवस्थेने वंचित ठेवलेल्या समाजातील लोकांची ही मरणासन्न आर्जवे आहेत. ही आर्जवे अत्यंत गरीब, कष्टकरी, शेतकरी, स्त्रीचे जगणे इ. घटकांचे भयाण वास्तव दाखवतात. कवीने डोळ्याने पाहिलेल्या, जगलेल्या व अनुभवलेल्या काही सण- उत्सवातील अत्यंत हृदद्रावक घटना कवीने हळव्या मनाने उलगडून त्याचा खरा चेहरा उघडा केला आहे.
“देवाच्या नावाने उधळला जातो रोज अमाप भंडारा
अन्नासाठी मात्र आम्ही रांगेत उभे पिढ्यानपिढ्या”.
केवळ ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशात आजही प्रत्येक धर्मात देवाच्या नावाने काही सण-उत्सव साजरे केले जातात. यामध्ये देणगीच्या स्वरूपात पावत्या घेऊन आर्थिक हातभार लावणारे अनेकजण दिसून येतात. मात्र तिथेच आजही देशातील बरेच लोकं केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी त्या सण अथवा उत्सवात धार्मिक स्थळाबाहेर अन्नाच्या घासासाठी रांगेत उपाशीपोटी उभे असतात. हे दृश्य ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही दिसून येते. याचे वास्तव चित्रण कवीने केले आहे. पोटाच्या भुकेवर कित्येक कविता आपल्या प्रभावी व सोप्या शब्दात करून कवीने भुकेचा प्रश्न समाजव्यवस्थेला दाखवून दिला आहे.
केवळ काही क्षणांची वासना शमवताना आजचा मनुष्य एक कोवळा जीव एका स्त्रीच्या पोटात ओझ्याच्या स्वरूपात वाढवत असतो. तर काही वेळा वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हट्टापायी एक वंश स्त्रीच्या पोटात वाढवत असतो पण ते मूल त्या स्त्रीने जन्माला घातल्यावर जर मुलगी जन्माला आली तर जन्माला घालणारे दोघेही त्या स्त्री जातीच्या अभ्रकाला न स्वीकारता कुठेही फेकून देतात. अशा कित्येक घटना देशात आजही घडून येतात. स्त्रीचा जन्म लाभला म्हणून जन्माला आल्याआल्याच लगेच तिचा तिरस्कार केला जातो. ती प्रथमतः जन्माला घालणाऱ्यांच नकोशी वाटू लागते. ही अत्यंत खालच्या पातळीची मानसिकता देशात आजही अस्तित्वात आहे. याकडेही कवीचे दुर्लक्ष झाले नाही. जगात कुठलीही गोष्ट करून दाखवण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये असते. दुःख झेलण्याचे, वादळाशी झुंजण्याचे, जगाशी दोन हात करण्याचे, लढण्याचेही सामर्थ्य स्त्रीमध्ये असते. परंतु तिला देशातली पुरुषप्रधान व्यवस्था त्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर करून देते का? जरी आजची स्त्री कितीही पुढे गेली असली तरीही अजूनही देशातील काही स्त्रीवर्ग आर्थिक व मानसिकपणे स्वातंत्र्यात आढळून येत नाही. स्त्री म्हणजे काय हे समजायला कठीण असले तरीही कवीने आपल्या काव्यसंग्रहात स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या व्यथा, विषमता, व तिच्या अंतर्मनातील धग मांडण्याचा आपल्या लेखणीद्वारे इमानपणे प्रयत्न केला आहे. वेश्या ही सुध्दा एक स्त्रीच असते. प्रत्येकवेळा वेश्या देहविक्री केवळ शरीरसुख किंवा पैशासाठी करत नसते. कधी कधी याचे कारण पोटाची भूक सुध्दा असू शकते. ही भूक तिच्या स्वतःच्या पोटाची अथवा तिच्या फेकून दिलेल्या कुटुंबातील सर्वाची असू शकते. अशा वेश्येला समाज कधी स्वीकारतो का? ती सजवते तिचा देह आणि झेलत राहते समाजाने तिला लावलेलं रांड नावाचं लेबल. तशीच अवस्था मूल नसलेल्या स्त्रीची असते. तिलाही समाज हिणवत असतो अपमान, अवहेलना कायम तिच्या वाट्याला येत असतात आणि तीही तिच्या वेदना झाकून जगत असते समाजाने वांझोटी म्हणून लावलेल्या बिरुदावलीच्या ओझ्याखाली. कवीने असे स्त्रीवादी व्यथांचे पैलू उघडे करताना स्त्रीने लहानापासूनच कणखर आणि सशक्त व्हावे. तिच्यावर होणारे अन्याय, लैंगिक अत्याचार, शोषण, यातून मुक्तता मिळवण्यासाठी स्वसंरक्षणाचा आग्रहही केला आहे.
“मुलींनो तुम्ही ना आता
निवडुंग व्हा!
लपेटून ठेवा काटे
कोणी स्पर्श केला तर
तुम्हालाही त्याचं रक्त काढता येईल…
संपूर्ण जगाला पोसणाऱ्या शेतकऱ्याच्या वाट्याला येणारी उपासमार, कर्जबाजारीपणा इ. प्रश्नांवर कवी ताकदीने व्यक्त झाला आहे. बदलल्या काळानुसार माणूस बदलत गेला पण सध्या त्याच्याकडून अत्याधुनिक युगात खूप काही चांगल्या गोष्टी निसटून चालल्या आहेत. याची जाणीव कवी करून देतो आहे. समाजातील जे चुकीचे आहे त्यातील भयाण वास्तव दाखवून देण्याचा प्रयत्न करताना कवीने अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे.
देवादादा झिंजाड यांनी पाठराखण केलेल्या या एकंदरीत काव्यसंग्रहात कवीने कवितेशी हितगुज करून आपल्या प्रभावी लेखणीच्या आधारे समाजाच्या व्याधी व आजारांचे अचूक निदान दाखवून देण्याचे कार्य केले आहे. डॉ. चंदू पवार पेशाने वैद्य असून त्यांच्याकडून मानवजातीची सेवा होतच आहे. त्याचबरोबरीने समाजाची सुद्धा सेवा त्यांच्या साहित्यातून घडत राहो आणि त्यांची लेखणी अशीच अनेक प्रश्नांना वाचा फोडत राहो. याच शुभेच्छा .
©️®️✍🏻 महेश भिसे (सातारा)







