Home » जीवनशैली » सामाजिक » अंध आदिवासी समाजातील लेकीची झेप : कुमारी साक्षी बंडू बुरकुलेचे ‘खेलो इंडिया’मध्ये सुवर्ण यश

अंध आदिवासी समाजातील लेकीची झेप : कुमारी साक्षी बंडू बुरकुलेचे ‘खेलो इंडिया’मध्ये सुवर्ण यश

Share:

वसंतधारा न्यूज पोर्टल
पुसद :-तालुक्यातील कुमारी साक्षी बंडू बुरकुले हिने खेलो इंडिया स्पर्धा मध्ये वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा मान उंचावला आहे. छत्तीसगड येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत साक्षीने उत्कृष्ट कामगिरी करत आपली जिद्द, मेहनत आणि चिकाटी सिद्ध केली.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील फेट्रा या छोट्याशा गावातून आलेली साक्षी अंध आदिवासी समाजातील असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तिने हे यश संपादन केले आहे. मर्यादित साधने, कठीण परिस्थिती आणि अनेक अडचणींवर मात करत तिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण गाव आणि समाजालाही अभिमान वाटत आहे.
साक्षीच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिच्या घरी जाऊन तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनी ताई यांनी विशेष उपस्थिती दर्शवून साक्षीचे कौतुक केले. त्यांनी साक्षीच्या मेहनतीचे व जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि शासनाकडून सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी साक्षीचे अभिनंदन करत तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
साक्षी बंडू बुरकुले हिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील आणि विशेषतः आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे साक्षीने आपल्या यशातून दाखवून दिले आहे. तिचे हे यश भविष्यात अनेक खेळाडूंना मार्गदर्शक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *