
वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क
पुसद : एखादे देऊळ म्हणजे फक्त विटा, सिमेंट नसतं… तो असतो गावाचा श्वास. रेवती ले-आऊट, ईटावा वॉर्डच्या मातीत रुळलेलं श्री. महादेवाचं छोटंसं मंदिर असंच होतं. ऊन असो वा पाऊस, सुख असो वा दुःख, या वॉर्डातील प्रत्येकजण पहिला दिवा महादेवापाशीच लावायचा.
पण… नवीन पाण्याच्या टाकीचा आराखडा आला आणि. हेच मंदिर त्या टाकीच्या वॉल कंपाऊंडमध्ये येत असल्याने ते हटवावे लागणार, अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. “आमचा महादेव जाणार का?” हा प्रश्न घेऊन म्हातारी-कोतारी माणसं सुन्न झाली.
तेव्हाच आमच्या हक्काच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनीताई नाईक धावून आल्या.
नगरपालिकेत झालेल्या बैठकीत त्यांनी खुर्चीवरच्या साहेब म्हणून नाही, तर या वॉर्डाच्या लेकी-सुनेसारखा विचार केला. मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, पाणीपुरवठा सभापती श्री. राजूभाऊ सोळंकी आणि ठेकेदार श्री. बिरजू सेठ यांच्या समोर त्यांनी एकच वाक्य सांगितले –
“टाकी बांधून पाणी देता येईल, पण लोकांची श्रद्धा तोडून पाणी पाजता येणार नाही. महादेवाला हटवायचं नाही, महादेवाला नवं, अधिक सुंदर घर द्यायचं.”
त्या एका वाक्याने सगळ्या बैठकीचा सूरच बदलला. टेबलावर फाईली होत्या, पण मनात श्रद्धा होती.
आणि मग तो सोनेरी क्षण आला.
निर्णय झाला – श्री. महादेवाचे मंदिर आहे तिथून हटणार नाही, तर त्याच वॉल कंपाऊंडच्या बाजूला, विधिपूर्वक, सर्वांच्या साक्षीने एक भव्य, सुंदर नवीन मंदिर बांधून दिले जाणार आहे.
या मंदिराच्या उभारणीची संपूर्ण जबाबदारी पाणी टाकी ठेकेदार श्री. बिरजू सेठ यांनी उचलत “हा माझ्या हातून महादेवाची सेवाच आहे” म्हणत आनंदाने स्वीकारली. त्यांच्यावर येणारा अधिकचा भार आम्ही सर्व वॉर्डवासी लोक वर्गणीतून उचलू, असा शब्द यावेळी सर्वांनी दिला.
आज रेवती ले-आऊट ईटावा वॉर्ड मध्ये आनंदाची लहर आहे. लोक म्हणत आहेत – विकासही झाला आणि देवही राहिला. हे फक्त सौ. मोहिनीताई नाईक यांच्या मुळेच शक्य झाले. त्यांनी दाखवून दिले की, सत्ता हातात असली की फक्त रस्ते-नाल्या नाही, तर माणसांची मनंही जपता येतात.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून बांधकाम सभापती श्री. अभिजित भाऊ पानपट्टे, शिक्षण सभापती श्री. खडसे सर, माजी नगरसेवक श्री. विष्णूभाऊ शिकारे, नगरसेवक श्री. ऋषिकेश पंडितकर, वॉर्डाचे नायक श्री. हाजूसिंग चव्हाण, श्री.सुरेश राठोड, श्री. बंडुसिंग चव्हाण, श्री. बाबुलाल जाधव, श्री. पंडित राठोड, श्री.महेश चव्हाण सर, इंजि.श्री. अक्षय पिवळटकर आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.




