वसंत ✒️धारा न्यूज नेटवर्क
पुसद : सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सहयोग मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, पुसद आणि उडान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेलू फाटा येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालकांनीही या सामाजिक कार्याचे स्वागत केले.
कार्यक्रमाला सहयोग मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे बँक व्यवस्थापक श्री. अशोक चोपडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी रवींद्र कांबळे, आकाश अडसर, बीडीओ सचिन राठोड, हर्षल भेंडे तसेच गायकवाड सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षण घेऊन उच्च ध्येय गाठावे, असे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांनी सहयोग मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी व उडान फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. समाजातील विविध घटकांनी शिक्षणासाठी पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मिळालेल्या शालेय बॅगबद्दल आनंद व्यक्त करत संस्था आणि फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यास हातभार लावणारा ठरला असून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




