राजना ते पुसद जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट
रस्ता सुधारणा कृती समितीची चळवळ सुरू
पुसद :-राजना, भंडारी,ब्राह्मणगाव, परिसरातील गावांना पुसद बाजारपेठेशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे, उखडलेले डांबरीकरण व कोसळलेल्या कडा दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पुसद ही मुख्य बाजारपेठ अवघ्या ३२ किलोमीटर अंतरावर असली तरी रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवास अत्यंत कष्टदायक झाला आहे. शेतमाल वाहतूक, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच रुग्णवाहिकांच्या हालचालींनाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
या प्रश्नावर सर्व गावांना एकत्र आणण्यासाठी “रस्ता सुधारणा कृती समिती” स्थापन करण्यात आली असून लवकरच समितीची बैठक घेऊन पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. यानंतर आमदार, खासदार, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासन यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार आहे.
समितीचे संयोजक सतीश पाटील यांनी सांगितले की, “हा कोणत्याही पक्षाचा विषय नाही. हा हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व कायमस्वरूपी सुधारणा न झाल्यास लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल.”
या पार्श्वभूमीवर विविध गावांतील नागरिकांनी एकत्र येऊन रस्ता सुधारणा कृती समिती स्थापन केली आहे. येत्या दिवाळी कालावधीत समितीची अंतर्गत बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये गावनिहाय जबाबदाऱ्या, स्वाक्षरी मोहीम, जनजागृती कार्यक्रम तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदन देण्याबाबतची पुढील रणनीती ठरविण्यात येणार
समितीने या चळवळीत महिला, युवक, शेतकरी, व्यापारी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले
“रस्ता आमचा हक्क आहे, उपकार नाहीत” या घोषवाक्याखाली सुरू झालेल्या या चळवळीला परिसरातील नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.




